जळगाव (प्रतिनिधी) सोशल मीडियावरील अनोळखी मैत्री आणि झटपट श्रीमंतीचा मोह बोदवड येथील नितीन रमेश चव्हाण (वय ३७) या बांधकाम व्यावसायिकाला चांगलाच महागात पडला. ‘शेअर ट्रेडिंग’मधून चौपट नफ्याचे आमिष आणि त्यानंतर ‘विदेशी मैत्रिणी’ला सोडवण्याच्या बहाण्याने या व्यावसायिकाची तब्बल ४४ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणीसायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोदवड येथील बांधकाम व्यावसायीक नितीन रमेश चव्हाण यांना सप्टेंबर २०२५ मध्ये फेसबुकवर ‘करीष्मा मिश्रा’ नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तिने ‘डीजीएम शेअर ट्रेडिंग’ नावाच्या अॅपमध्ये गुंतवणूक केल्यास चार पट फायदा होईल, असे आमिष दाखवले. चव्हाण यांनी विश्वास ठेवून सुरुवातीला १ लाख ६० लाख आणि नंतर १ लाख ९० लाख रुपये असे एकूण ३ लाख ५० हजार रुपये गुंतवले. अॅपवर त्यांना नफाही दिसत होता. हा प्रकार सुरू असतानाच, चव्हाण यांची फेसबुकवर ‘डेव्हिसीन लींडा’ नावाच्या दुसऱ्या महिलेशी ओळख झाली.
लिंडाच्या सुटकेसाठी उकळले पैसे
ओखळ झालेल्या डेव्हीसीन लींडा हीने ती भारतात फिरण्यासाठी येत असल्याचे सांगितले. काही दिवसांनी चव्हाण यांना दिल्ली एअरपोर्टवरून एका ‘कस्टम अधिकारी’ महिलेचा फोन आला. तिने ‘डेव्हिसीन लींडा’ यांना अतिरिक्त फॉरेन करन्सी बाळगल्याप्रकरणी अटक केल्याचे सांगितले. तिची सुटका करण्यासाठी आणि क्लिअरन्ससाठी बनावट बँक अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. विश्वास बसावा यासाठी त्यांना ‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’चे बनावट एटीएम कार्डही पाठवण्यात आले. यानंतर ‘लिंडा’च्या सुटकेसाठी वेगवेगळ्या कारणांनी चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले.
पैसे भरल्यानंतर तिन्ही महिलांचे
फोन झाले बंद
‘शेअर ट्रेडिंग’ आणि ‘विदेशी मैत्रिणी’च्या सुटकेच्या नावाखाली दोन्ही आरोपींनी मिळून चव्हाण यांच्याकडून एकूण ४४ लाख ५ हजार रुपये उकळले. पैसे भरूनही परतावा मिळाला नाही व दोन्ही महिला, कस्टम अधिकारी आणि बँक अधिकारी यांचे फोन बंद येऊ लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात आले. त्यांनी अखेर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
















