नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी याचे पालन होत नसल्याचं पाहायला मिळतय. उत्तर प्रदेशमध्ये अशीच एक घटना समोर आलीय. कोरोना नियमावलीची एैशीतैशी अन् सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला आहे. मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेसाठी तुफान गर्दी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
मुस्लिम धर्मगुरु अब्दुल हमीद मोहम्मद सालिमुल कादरी यांचं रविवारी निधन झालं. दरम्यान लॉकडाउन असतानाही त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. बदायूँ येथील मशिदीत त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. यावेळी अत्यंदर्शनासाठी उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागातून नागरिक लॉकडाउनचं उल्लंघन करत मशिदीत पोहोचले होते. मशिदीच्या बाहेर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. “बदायूँमध्ये मुस्लीम धर्मगुरुच्या अंत्ययात्रेदरम्यान कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८८ तसंच संबंधित इतर कलमांच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती बदायूँचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक संकल्प शर्मा यांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.
देशात गेल्या २४ तासांत देशात ३ लाख २९ हजार ९४२ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३८७६ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे.