जळगाव (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला असून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती आवश्यक आहे. एखाद्या समाजाने पुढाकार घेत घरातील टाकाऊ प्लास्टिक वस्तूपासून काहीतरी उत्तम कलात्मक साकारले जाऊ शकते यासाठी सर्वांना प्रेरणा देणारा मेळावा आयोजित करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचे प्रतिपादन महापौर सौ. भारती सोनवणे यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दाऊदी बोहरा समाजाच्या महिला, मुलांचा हुनर का बाजार बोहरा मस्जिदमध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे महापौर सौ. भारती सोनवणे होत्या. यावेळी डॉ. सोनाली महाजन, मंगला महाजन, अध्यक्ष आमीलसाब शेख सैफुद्दीन अमरावतीवाला, अध्यक्षा बतुल अमरावतीवाला, मदरसा मुख्याध्यापक शेख अब्दुल कादर, हाफिज अम्मार, जमात सचिव मोईज लेहरी, खजिनदार युसूफ मकरा, दाऐरतुल अकीकच्या सचिव सकिना लेहरी, खजिनदार हाजरा अमरेलीवाला, हेल्थ आणि हुनरच्या खजिनदार सकिना बालासिनोरवाला, उमुर तालेमिया समन्वयक मारिया बदामी, उमुल बनीन आदींसह इतर बोहरा समाज महिला आणि मुले उपस्थित होते.
बोहरा समाजाचे धर्मगुरू डॉ. सैय्यदना अबू जाफरुस सादिक आली कादर मुफद्दल सैफुद्दीन मोला यांनी प्लास्टिक टाळत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्येकाला पटवून देण्याचा संदेश दिला आहे. धर्मगुरूंच्या आदेशाचे पालन करीत जळगावातील बोहरा समाजाच्या महिला आणि लहान मुलांसाठी एक स्पर्धेचे आणि ‘सुकूल हिरफा’ हुनर का बाजार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे आयोजन दाऐरतुल अकीक, हेल्थ अँड हुनर यांनी बुरहानी वुमन्स, तलेबात उल कुल्लीयात, बुनीयात उल इदीज जहाबी यांच्या सहकार्याने केले होते.
सर्व संस्थेच्या अध्यक्षा बतुल अमरावतीवाला यांनी सांगितले की, आपल्या धर्मगुरूंनी सर्वांना प्लास्टिक बॅग न वापरण्याचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे आपण या मेळाव्यात प्लास्टिक बॅगचा उपयोग केला नाही. तसेच मेळाव्यात कापडी बॅगचा उपयोग करावा हे लहान मुलांना शिकवले. आपले धर्मगुरू नेहमी सांगतात, आम्ही आपल्या देशाचे चांगले नागरिक आहोत. आपण ज्या देशात राहतो त्याच्यावर प्रेम करा हा आपल्या प्रामाणिकतेचा भाग आहे आणि त्याचमुळे आपण हा कार्यक्रम २६ जानेवारी रोजी आयोजित आहे. तसेच स्वच्छता राखणे देखील आपली जबाबदारी आहे असल्याची धर्मगुरूंची शिकवण असल्याचे त्या म्हणाल्या.
कलात्मक वस्तू, पाण्याच्या टाकाऊ बाटलीतील रोपांनी वेधले लक्ष
मेळाव्याचे उदघाटन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी फित उघडून केले. प्लास्टिक बंदी असली तरी बऱ्याचशा प्लास्टिकच्या वस्तू आपल्या घरात येत असतात. घरातील टाकाऊ प्लास्टिकपासून साकारलेल्या विविध आकर्षक कलात्मक वस्तूंनी महापौरांसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मेळाव्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे महिलांनी घरातील टाकाऊ पिण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि कॅनचा उपयोग करून आकर्षक कुंड्या तयार केल्या होत्या आणि त्यात रोप लावलेले होते. पेन स्टँड, सेल्फी पॉईंट, कुंडी, लहान कारंजे अशा कितीतरी आकर्षक वस्तू महिलांनी साकारत पर्यावरण बचावचा संदेश दिला.
चिमुकल्यांना दिले व्यवसाय आणि बचतीचे व्यवहार ज्ञान
मेळाव्यात लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजयी चिमुकल्यांना आकर्षक पारितोषिक देखील देण्यात आली. लहानपणापासूनच मुलांमध्ये व्यवसाय आणि बचतीचे व्यवहार ज्ञान अवगत होण्यासाठी मेळाव्यात भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ विक्रीचे देखील स्टॉल थाटण्यात आले होते. महापौर सौ. भारती सोनवणे यांनी चिमुकल्यांशी संवाद साधत फळे खरेदी केले.