धरणगाव (प्रतिनिधी) येथील तहसिल कार्यालयात नुकताच जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
धरणगाव तहसिल कार्यालय येथे दि. १५ मार्च रोजी “जागतिक ग्राहक हक्क दिवस” चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी तहसिलदार तथा निवासी नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते हे होते. तर प्रमुख पाहुणे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश तायडे, ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष विनायक महाजन, सचिव सतीश असर तसेच धरणगाव स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जी.डी.पाटील,उपाध्यक्ष प्रभाकर अण्णा पाटील, राजू ओस्तवाल तसेच अनेक सुजाण नागरिक व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिनेश तायडे यांनी सर्व उपस्थितांना जागतिक ग्राहक दिनाबाबतची पार्श्वभूमी कथन करुन ग्राहकांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. ग्राहक हा संपूर्ण अर्थव्यवस्थेचा राजा असून त्याचेवर संपूर्ण अर्थचक्र हे गतिमान आहे. ग्राहकाचे हक्क व त्यांचे संरक्षण होणे हे महत्वाचे असल्याचे त्यांनी मार्गदर्शनात प्रतिपादन केले.