मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर अभिनेते शरद पोंक्षे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देणार असल्याची चर्चा होत आहे. हिंदुत्व आणि सावरकरांवरुन भाजप नेहमीच शिवसेनेला लक्ष्य करत असते. या पार्श्वभूमीवर भाजपला उत्तर देण्यासाठी शिवसेनेकडून शरद पोंक्षे यांचे नाव देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या आहे.
मात्र, शरद पोंक्षे हे नाव महाविकासआघाडीतील राष्ट्रावादी आणि काँग्रेसला चालणार आहे का? असा प्रश्नही देखील उपस्थित होत आहे. विधान परिषदेवर 12 आमदारांना नियुक्त करण्यासाठी राज्यपाल कडक नियम लावणार असल्याचे समजत आहे. तसेच प्रत्येक पक्ष राज्यपाल ग्राह्य धरतील अशीच नावे देण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पोंक्षे यांचं नाव याच चौकटीत बसणार आहे. शिवसेनेला हिंदुत्व आणि सावरकर यांच्यावरुन भाजप नेहमीच टार्गेट करत असते. पोंक्षे हिदुत्व आणि विशेषतः सावरकरवादी असल्याने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन भाजपला शह देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत चर्चेत असल्याचे समजते आहे. अस्पृश्यतानिवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देऊ नये, अशी विनंती आरपीआयचे अध्यक्ष सचिन खरात यांनी दिली आहे.
शिवसेना हा वेगळा पक्ष आहे, त्यांना अधिकार आहे आपली नावे ठरवण्याचा. पण आम्ही खूप विचार करून चांगले उमेदवार दिले आहेत, अशी प्रतिक्रिया उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर पोंक्षेवर आता बोलण्यात काही अर्थ नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.