भुसावळ (प्रतिनिधी) दोन गावठी पिस्टल आणि दोन चॉपरसह तिघांना भुसावळ तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली आहे. शाहरुख राजु पटेल (रा. साकेगाव ता. भुसावळ), विकास पांडुरंग लोहार (रा. श्रीराम नगर साकेगाव ता. भुसावळ) आणि ‘जयसिंग उर्फ सोनु रायसींग पंडीत (रा. वाल्मीक नगर भुसावळ ता. भुसावळ) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
भुसावळ शहरानजीक साकेगाव परिसरात शाहरुख राजु पटेलकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती उप विभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यानंतर वाघचौरे यांनी त्यांच्या पथकातील पो.हे. कॉ. सुरज पाटील, रमण सुरळकर, पोलिस नाईक उर यासीन पिंजारी व संकेत झांबरे आदींना याबाबत कारवाई करण्याची सुचना दिली. पथकातील सर्व कर्मचारी शाहरुख पटेल बाबत गोपनीय माहिती काढायला लागले आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
3 मे रोजी शाहरुख पटेल हा भुसावळ – साकेगाव रस्त्यावरील मराठी शाळेच्या पटांगणावर आला असल्याची माहिती पथकाला समजली. पथकाने काही समजण्याच्या आत त्याला शिताफीने सापळा रचून अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांना एक गावठी पिस्टल, एक जिवंत काडतूस, दोन चॉपर आणि मोटार सायकल आदी मुद्देमाल मिळून आला. अधिक चौकशी केली असता त्याने आणखी एक गावठी पिस्टल त्याचा मित्र विकास पांडुरंग लोहार याच्याकडे असल्याचे कबूल केले. त्या माहितीच्या आधारे विकास लोहार याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.