मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं महाविकासआघाडी सरकार अडचणीत आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक आवाहन केल्यानंतरही शिवसेनेला लागलेली गळती काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी साधलेल्या संवादानंतरही आज सकाळी काही आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल जोरदार शक्तीप्रदर्शन करत वर्षा हे निवासस्थान सोडून मातोश्रीमध्ये आले. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर आमदार असल्यामुळे मुख्यमंत्री राजीनामा देऊ शकतात, त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12.30 वाजता मंत्रालयातील सगळ्या सचिवांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत.
मंत्रालय अंतर्गत बैठक असल्यामुळे याचं प्रक्षेपण करता येणार नाही. अडीच वर्ष केलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्री आभार व्यक्त करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंड पुकारलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आणि त्यानंतर त्यांनी आपलं शासकीय निवासस्थान सोडलं. आमदारांनी बंड केल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे