जळगाव (प्रतिनिधी) महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठातील वाळलेली लाकडे विद्यापीठाने महापालिकेकडे नुकतीच हस्तांतरित केली आहेत.
येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे काही दिवसांपूर्वी परिसरातील वाळलेली तसेच वादळामुळे कोसळलेली झाडे तोडणी करून एकत्रित करण्यात आलेली होती. सदर तोडणी झालेल्या लाकडांचा विद्यापीठातर्फे लिलाव केला जाणार होता. मात्र, यासंदर्भात माहिती मिळताच महापौर जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी वेळीच विद्यापीठ व्यवस्थापनाशी संपर्क साधून सकारात्मक चर्चा केली. त्यात संबंधित लाकडे आपण महापालिकेला द्यावीत. आम्ही ती महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणच्या स्मशानभूमीकडे देऊन ती गोरगरीब जनतेला अंत्यसंस्कारासाठी मोफत देऊ, असा प्रस्ताव दिला. तो विद्यापीठ प्रशासनाने मान्य केला. काल (८ मे २०२१) सकाळी पावणेबाराच्या सुमारास सर्व लाकडे विद्यापीठाने महापालिकेकडे हस्तांतरित केली.
याप्रसंगी कुलगुरू प्रा.ई. वायुनंदन, प्र-कुलसचिव डॉ. शा.रा. भादलीकर, विद्यापीठ कर्मचारी, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, महापौर जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे आदी उपस्थित होते. संबंधित लाकडे महापालिकेकडे हस्तांतरित होताच महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या सूचनेवरून महापालिकेतर्फे आपल्या विविध वाहनांच्या मदतीने जळगावातील ठिकठिकाणच्या स्मशानभूमीत तत्काळ वाहून नेण्याचे कार्य सुरू झाले. ही लाकडे शहरातील विविध भागांतील गोरगरीब जनतेला अंत्यसंस्कारासाठी मोफत दिली जाणार आहेत.