धरणगाव (प्रतिनिधी) चारचाकी वाहनातून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिघा दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल एक कोटी 60 लाख रुपयांची रोकड लांबवल्याची सिनेस्टाईल घटना धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ शनिवार, 17 रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने जिल्हाभरात खळबळ उडाली असून दरोडेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्ह्यात वापरलेले वाहन हे फैजपूर येथून चोरल्याचे स्पष्ट असून दरोडेखोरांना परफेक्ट टीमप मिळताच त्यांनी पाळत ठेवून नियोजनबद्धरीत्या दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे.
सिनेस्टाईल एक कोटी 60 लाख लूटले
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दुर्गेश इम्पेक्स नामक जिनिंग आहे. शनिवारी शेतकर्यांना कापसाचे पेमेंट करावयाचे असल्याने जळगाव येथील अॅक्सीस बँकेतून एक कोटी 60 लाखांची रोकड जिनिंग कर्मचारी योगेश पाटील, लेखापाल दीपक महाजन व चालक उमेश पाटील यांनी यांनी काढल्यानंतर क्रेटा कारने पिंप्री येथे येण्यासाठी प्रवास सुरू केल्यानंतर शनिवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास मुसळी फाट्याजवळील निलॉन्स कंपनी समोरील उड्डाण पुलाखाली लाल रंगाच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली व काही क्षणातच स्कॉर्पिओतून तोंडाला मास्क लावलेले 30 ते 35 वयोगटातील तीन संशयित उतरले व त्यांनी दुर्गेश जिनिंगच्या क्रेटा वाहनाच्या काचा फोडून योगेश पाटील, लेखापाल दीपक महाजन व चालक उमेश पाटील यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकल्याने तिघे प्रचंड हादरले व काही क्षणात तिघा दरोडेखोरांनी वाहनाच्या डिक्कीतील कापडी पिशव्यांमध्ये असलेली एक कोटी 60 लाखांची रोकड लूटली. यावेळी स्कॉर्पिओ वाहन सुरू न झाल्याने त्यांनी अन्य इको वाहनाने ठोकली. घटनास्थळापासून काही अंतरावर इको वाहनही सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
रेकी करून टाकला दरोडा
दरोडेखोरांनी आणलेली स्कॉर्पिओ कार क्रेटा वाहनाला धडक बसल्यामुळे सुरू झाली नाही तर धक्का देवूनही उपयोग न झाल्याने दरोडेखोरांनी प्लॅन बी प्रमाणे अन्य इको वाहनही घटनास्थळी बोलावून ठेवल्याचे स्पष्ट आहे. याच वाहनातून काही अंतरापर्यंत दरोडेखोरांनी प्रवास केला. दरोडेखोरांनी पूर्ण नियोजनबद्धरीत्या रेकी करून हा दरोडा टाकल्याचे स्पष्ट आहे. चाळीसगावच्या अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, धरणगाव पोलिस निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
फैजपूरातील वाहनांचा दरोड्यासाठी वापर
खास सूत्रांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यासाठी फैजपूर येथून स्कॉर्पिओ व इको वाहन शुक्रवार, 16 रोजी चोरले व अत्यंत नियोजनबद्धरीत्या शनिवारी दरोडा टाकला. सुरूवातीला स्कॉर्पिओतून आलेल्या दरोडेखोरांनी तक्रारदारांच्या वाहनाला धडक दिली व स्कॉर्पिओ तेथून टाकून दरोडेखोर इकोतून पसार झाले मात्र काही अंतरावर ही इको सापडली असून अन्य वाहनाने सराईत दरोडेखोर पसार झाले.
दरम्यान, फैजपूर येथील शिक्षक दिनेश भानुदास किरंगे यांच्या मालकिची पांढर्या रंगाची इको (एम.एच.19 एएक्स.0796) व फैजपूर येथीलच शेख अनिस शेख सत्तार यांच्या स्कॉर्पिओ (एम.एच.41-0999) ही शुक्रवारी चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. याच दोन वाहनांचा दरोड्यासाठी वापर झाला असून दरोड्यानंतर दोन्ही वाहने घटनास्थळाजवळून जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
















