मुंबई प्रतिनिधी । देशाचा जीडीपी घसरला म्हणून कधी कुणी शोकसभा आयोजित केल्याचं ऐकलंय का? हा प्रश्न आश्चर्यचकित करणारा असला, तरी हे घडलं आहे. ऑगस्टमध्ये आलेल्या जीडीपीच्या आकड्यानंतर काँग्रेसनं जीडीपी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा आयोजित केली.
ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आलेले जीडीपी आकडे ऐतिहासिक ठरले. चार दशकात पहिल्यांदाच भारताच्या जीडीपीत मोठी घसरण झाली. मागील तिमाहीत झालेल्या जीडीपीच्या घसरणीनंतर विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आग्र्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपा सरकारविरोधात टीका करताना चक्क जीडीपीच्या निधनाचीच शोकसभा आयोजित केली. शोकसभेला उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्यानं सांगितलं,”देशाच्या मृत पावलेल्या जीडीपीसाठी शोकसभा आयोजित केली आहे. २०२०-२१च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ उणे २३.९ टक्क्यांवर घसरला आहे. जगभरातील इतर सर्व मोठ्या अर्थव्यवस्थामधील ही सर्वात निच्चांकी आहे,” असं काँग्रेस नेत्यानं सांगितलं. राम टंडन म्हणाले,”नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या काळात जीडीपीची सतत होणारी घसरण हे भारतासाठी एक डाग आहे,” असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याबद्दलही टंडन यांनी मोदी सरकारला दोषी ठरवलं.