तळाेदा (प्रतिनिधी) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना मंत्री, खासदार, जिल्हा बँक व जिल्हा दूध संघाची महत्त्वाची पदे आपल्या कुटुंबातच हवीत. तसेच जळगाव जिल्हा दूध संघातील तूप व लोणी खडसे यांच्या कुटुंबाने खाल्ले असल्याने त्यांना अधिक बोलण्याचा अधिकार नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. ते तळोदा येथे बोलत होते.
तळाेदा येथील बिरसा मुंडा चौकात उभारलेल्या क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे अनावरण मंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.ना. महाजन पुढे म्हणाले की, दूध संघातील काही कर्मचाऱ्यांनी गुन्हाही कबूल केला असून दोन जणांना अटक झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुढील चौकशीला व या प्रकरणाला राजकीय रंग न देता सत्य काय आहे ते बाहेर येऊ द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महाजन पुढे म्हणाले की, भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्यामुळे तरुणांना प्रेरणा मिळेल. आदिवासी समाजाचा आर्थिकदृष्ट्या स्तर उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहे. योजना भरपूर आहेत, मात्र त्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत कशा पाेहाेचतील, हे महत्त्वाचे आहे. त्या साठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
पुतळा अनावरण कार्यक्रमाला खासदार डाॅ. हीना गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमशा पाडवी, आमदार काशीराम पावरा, आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, विजय चौधरी, डॉ.शशिकांत वाणी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील आदी उपस्थित हाेते.