धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव येथील संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट मुकेश कुरील यांनी दि. १३ नोव्हेंबर पासून सायकलवरून सुरु केलेल्या जळगाव ते दिल्ली संविधान साक्षरता अभियानाचे स्वागत धरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला अभिवादन करून करण्यात आले.
धरणगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक आनंदा वाघमारे यांच्या हस्ते कुरील यांचा सत्कार करण्यात आला. कुरील हे १३ ते २६ नोव्हेंबर या दरम्यान सायकलवर दिल्लीला राष्ट्रपती भवनापर्यंत जाणार असून ठिकठिकाणी गावांमध्ये ते संविधान साक्षरतेचे महत्व पटवून देणार आहेत. भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचावे, संविधानाचा प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न करावा असा आग्रह ते करणार आहेत.
प्रास्ताविकातून डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी कुरील यांच्या प्रयत्नांचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी,आबा वाघ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किशोर खैरनार,सिताराम मराठे, नंदू करोसिया, गणेश करोसिया, भगवान रोकडे, अरूण बहारे, मयुर भामरे, नरेंद्र बिवाल, अजय मैराळे, विजय तायडे, राजेंद्र बागूल या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.