अमळनेर (प्रतिनिधी) शेतकऱ्यांना पिकं काढायला जमते. परंतू पिकवलेला माल विकणे जमत नाही. म्हणून शेतकरी व्यापाऱ्यांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या मागे आहे. यासाठी शेतकऱ्यांना पीक काढणी पश्चातचे व्यवस्थापन आणि विक्री कौशल्य आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा प्रबंधक श्रीकांत झांबरे यांनी केले. ते राजमाता जिजाऊ महिला मंडळ आयोजित जळगाव व धुळे जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनी संचालकांच्या ‘क्षमता बांधणी प्रशिक्षण’ कार्यशाळेत बोलत होते.
श्रीकांत झांबरे पुढे म्हणाले की, भारत कृषि प्रदान देश आहे . भारतात शेतकरी सक्षम झाला पाहिजे. नाबार्डकडून शेतकरी क्षमता बांधणी करिता शेतकरी मंडळे व शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करीत आहे. शेतकऱ्यांमध्ये विक्री कौशल्य वाढवण्याकरिता प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन धुळे नाबार्डचे जिल्हा प्रबंधक विवेक कृष्णा पाटील यांनी केले. या प्रसंगी ते म्हणाले की, शेतकरी उत्पाद कंपन्यांनी आपल्या सभासदांचा उत्पादीत शेतमाल एकत्रित करून त्यावर छोट्या -छोट्या प्रक्रिया करायला सुरुवात करावी. कोरोना महामारीच्या संकट काळात उत्पादक शेतकऱ्यांना व्यापारी बनण्याची संधी निर्माण झाली आहे. त्यातून अनेक भाजीपाला व दुध उत्पपादक शेतकऱ्यांनी ग्राहकांचे व्हॉट्सपग्रुप तयार करून थेट शेतकरी ते ग्राहक अशी ऑनलाईन प्रणालीचा वापर करून ऑर्डर प्रमाणे आपला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचविला.
मातोश्री , इंदूताई ऍग्रो फार्मर्स प्रड्युसर कंपनी लि .टाकरखेडा ता .अमळनेर जि . जळगाव या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र श्रीकांत झांबरे जिल्हा प्रबंधक नाबार्ड जळगाव यांच्याहस्ते देण्यात आले. तर ऍग्रो फ्युचर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ली. अजंदे ता .शिंदखेडा जि. धुळे या कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र धुळे नाबार्ड जिल्हा प्रबंधक विवेक पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
मालाचा दर्जा आणि पॅकेजींग बाबत एल.डी.एम. अरुण प्रकाश यांनी मोलाचा सल्ला दिला. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पातर्गत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी दादाराव विठ्ठल जाधवर यांनी केले. उत्पादक ते ग्राहक अशी मुख्य सकाळी निर्माण केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो, असे पुणे येथील यशदा मास्टर ट्रेनर प्रा. अशोक पवार यांनी सुचवले. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प ( स्मार्ट ) बाबत तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी सविस्तर माहिती दिली. सकाळच्या सत्रात शेतकरी उत्पादक कंपनी संकल्पना आणि फायदे या विषयावर पुणे येथील यशदा मास्टर ट्रेनर भटू पाटील यांनी तर दुपारच्या सत्रात प्रकल्प आराखडा आणि बॅंक कर्ज या विषयावर व्यवसाय सल्लागार देवेंद्र सुर्यवंशी यांनी प्रशिक्षण दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत झांबरे तर कार्यक्रमाचे उदघाटक विवेक पाटील हे होते. मुख्य उपस्थिती अरुण प्रकाश, प्रमुख मार्गदर्शक दादाराव विठ्ठल जाधव, अमळनेर गटविकास अधिकारी संदीप वायाळ, अमळनेर तालुका कृषि अधिकारी भरत वामन वारे, राजमाता जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा पूनम भटू पाटील, प्रशिक्षण समनव्यक सुरभी सिर्यवंशी तर सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रगती पाटील यांनी केले.
No