मुंबई (वृत्तसंस्था) एका संपूर्ण पिढीचे भवितव्य पणाला लागले आहे. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. सध्या न्यायालयापुढे मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी केले आहे.
विवेक राहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यातील केतुरा गावातील हा तरुण आहे. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगाने पार्थ पवार यांनी ट्वीट केले आहे. मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचे ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचे सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावे आणि आरक्षणासाठी लढायला हवे. महाराष्ट्र सरकारनेही यात तातडीने लक्ष घालावे. मी मराठा आंदोलनाची ज्वलंत मशाल घेण्यास तयार आहे. विवेक आणि इतर कोट्यवधी असहाय्य ‘विवेक’साठी न्यायाचे दार ठोठावण्यासाठी तयार आहे, असे पार्थ यांनी म्हटले आहे.