अमळनेर (प्रतिनिधी) ‘माझे कुटुंब…माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाला मदत करून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अनिल पाटील यांनी केले आहे.
सोमवारी रात्री भांडारकर महाविद्यालयात पटांगणात ‘माझी जबाबदारी…माझे कुटुंब’ या मोहीमेच्या प्रचारार्थ प्रविण पाटील, निवृत्ती बागुल आणि विनोद जाधव यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैठक आयोजित केली होती.यावेळी व्यासपीठावर प्रा.सुभाष पाटील, कामगार नेते एल.टी.पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील, मांडळ येथील माजी पं स. सभापती किसन काशीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव पाटील, प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत आदी उपस्थित होते.
यावेळी सडावन येथील वि.का.स सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक पाटील यांची निवड झाल्याबद्दल व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या तालुकाध्यक्ष पदी भगवान पाटील यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यात प्रारंभी दीपक पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर संदीप घोरपडे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या विषयावर कोरोनासंदर्भात माहिती दिली.
यावेळी आमदार अनिल पाटील यांनी कोरोनासंदर्भात माहिती देतांना तालुक्यात सर्वप्रथम आपण खाजगी डॉक्टरांच्या माध्यमातून सर्दी, ताप, खोकला यांचे आरोग्य तपासणी शिबीर व कोव्हीड केअर सेंटर उघडले. त्यानंतर रोटरी क्लब व बोथरा कुटूंबीय यांच्या माध्यमातून ग्रामीण कोव्हीड रुग्णालयात ऑक्सिजन व्यवस्था केली. त्यात आधी २० बेड असतांना आपण इतर व्यवस्था करून ३५ बेडपर्यंत ऑक्सिजन सुविधा केली अशी माहिती दिली. निवडून आल्यानंतर काही गावांना कोरोनामुळे भेटी देता आल्या नाहीत. मात्र, आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सर्वेक्षणाला मदत करून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. याचबरोबर त्यांनी आगामी बाजार समिती नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी कामाला लागावे असे सूचक विधान केले. तसेच जनसंपर्क वाढवा जेणेकरून आपल्याला हक्काचे कार्यालय उपलब्ध होईल. त्यांच्या मदतीने नागरिकांचे काम होईल व आपली वर्णी लागेल यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
तसेच संदीप घोरपडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, नागरिकांनी सहजपणे कोरोनाला घेतले आहे. परंतु हा आजार किती जीवघेणा आहे, आपण त्यातुन काय बोध घेतला पाहिजे हे सांगितले. त्यात स्वतःला कोरोना झाला तर कुटुंबात वयोवृद्ध व इतर आजारांचे नातेवाईक, आई, वडील, छोटी छोटी मुले, पत्नी, भाऊ असतात त्यांना जीवाला धोका होऊ शकतो यापासून स्वतःचे संरक्षण आणि कुटूंबाचे संरक्षण कसे करावे, याबरोबरच माझे कुटुंब माझी जबाबदारी यांचा सर्व्हे सुरू आहे. त्यात जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी धडपड करून कुटुंबाची तपासणी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे समस्त पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक वर्ग उपस्थित होते, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद कदम यांनी केले.















