मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अद्याप या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद शहरासह जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यात त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील अनेक विकासकामांचं उद्धाटन केलं होतं. परंतु त्यांचा हा दौरा आता वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार औरंगाबाद पोलिसांमध्ये देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात आले होते. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती. औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रात्री 10 नंतर लाऊड स्पीकरवरून भाषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री 10 वाजेनंतर लाऊडस्पीकर लाऊन भाषण करण्यास मनाई असताना भाषण केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.