मुंबई (वृत्तसंस्था) शाळा सुरु केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत बोलवणे धोक्याचे ठरेल. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यासाठी यावर सखोल चर्चा होणे गरजेचे आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निर्णय घेतला जाईल.सध्या कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहे.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे. तुर्तास इयत्ता दहावी आणि नववी तुकड्या सुरू करण्याचा विचार नाही. शहरी भागात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे. केंद्र सरकारने २१ सप्टेंबरपासून नववी ते बारावी पर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात शाळा सुरु करणे एवढ्यात तरी शक्य नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने याबाबत गाईडलाईन्सही जारी केल्या आहेत. मात्र बहुतेक शिक्षक, संस्थाचालक यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही आता कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे शाळा तुर्तास सुरू करण्यास हरकत घेतली असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.