गाझियाबाद (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील वादग्रस्त व्यक्तिमत्व वसीम रिझवी यांनी आज सकाळी इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांनी रिझवी यांना सनातन धर्मात प्रवेश करवून घेतला.
वसिम रिझवी हे मागील काही वर्षांपासून कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर होते. त्यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे ते माजी अध्यक्ष आहेत. हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर ते म्हणाले, मला इस्लाममधून बाहेर काढण्यात आले आहे. माझ्यावर दर शुक्रवारी ईनामाची रक्कम वाढवली जाते. त्यामुळे आज मी सनातन धर्म स्वीकारत आहे.
मला इस्मालमधून काढल्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा ही माझी मर्जी आहे. हिंदू धर्म जगातील सर्वात पहिला धर्म आहे. या धर्माइतक्या चांगल्या गोष्टी अन्य कोणत्याही धर्मात नाहीत. इस्लामला मी धर्मच मानत नाही. दर शुक्रवारी नमाजानंतर माझ्या शिर धडावेगळे करण्याचे फतवे काढले जातात. अशा स्थितीत मला कोणी मुसलमान म्हटले तर मला स्वत:लाच शरम वाटते, असे रिझवी म्हणाले.
रिझवी यांनी काही दिवसांपूर्वीच आपलं मृत्यूपत्र सार्वजनिक केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या मृत्यूनंतर मृतदेहाचे दफन न करता दहन केले जावे. हिंदू प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार करावेत. यति नरसिंहानंद यांनी आपल्या चितेला अग्नी द्यावा, असंही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, वसीम रिझवी यांनी कुराणातील 26 आयत काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.