सोलापूर (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण स्थगिती विरोधात मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या सोलापूर बंदला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी माढ्यात रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाले आहेत. सोलापुरात माढा तालुक्यात टायर जाळून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर देखील आंदोलनं करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात माढामध्ये उग्र स्वरूपाच्या निदर्शने करून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर शहरात सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्याघरासमोर आंदोलनसाठी कार्यकर्ते एकत्रित जमणार आहेत. शहरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान रविवारी मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पावित्रा घेत मुंबईत ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुंबईतील जवळपास 18 ठिकाणी हे आंदोलन केले गेले. मराठा आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चा निषेध नोंदवला. मुंबई लगतच्या शहरांमध्ये एकाच वेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले.