मुंबई (प्रतिनिधी) संगमनेरमधील २ शाळांना सरसकट २० टक्के अनुदान देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने हे अनुदान १ नोव्हेंबर २०१६ पासून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
अंजुमन प्राथमिक स्कुल संगमनेर व सह्याद्री प्राथमिक विद्यामंदिर संगमनेर या दोन शाळांमधील एकूण ८ पदांना हे २० टक्के अनुदान देण्यात येईल. याअनुषंगाने या शाळांना जून २०१२ ते ऑक्टोबर २०१६ पर्यंत नियमबाह्यरित्या क्षेत्रीय स्तरावरुन अनुदान वितरीत करण्यात आले होते. सदर शाळांना शासनस्तरावरुन अनुदान मंजूर झालेले नाही ही बाब निदर्शनास आल्यावर या दोन्ही शाळांचे अनुदान बंद करण्यात आले होते. या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती.
या नियमबाह्य वेतन अनुदान प्रकरणी अनियमितता करणाऱ्या संबधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत.