जळगाव (प्रतिनिधी) वडिलांच्या दशक्रिया विधीसाठी गेलेल्या आनंद रमेशचंद्र मालविया (वय ४९, रा. लक्ष्मी नारायण नगर) यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. ही घटना दि. ११ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील लक्ष्मी नारायण नगरात राहणारे आनंद मालविया हे जाहिरात व्यावसायिक आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या दशक्रिया विधीसाठी मालविया हे कुटुंबासह दि. १० नोव्हेंबर रोजी गणेश कॉलनीतील घरी आले होते. त्यावेळी लक्ष्मी नारायण नगरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. तसेच वरच्या मजल्यावरील खोलीमधील कपाटातून रोख ७५ हजार रुपये, २२ हजार ५०० रुपये किंमतीचे चांदीचे नाणे, चार हजार ५०० रुपयांच्या पैंजण, पाच हजारांचे सोन्याचे सहा मणी, १५ हजारांच्या सोन्याच्या दोन नथ, सात हजार ५०० रुपयांचा सोन्याचा हार, ३० हजारांचे सोन्याचे कर्णफुले असा एकूण एक लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी मालविया यांनी दि. १२ डिसेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे करीत आहेत.
शेजाऱ्यांनी दिली चोरीची माहिती
दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी शेजारील गजानन पाटील यांनी मालविया यांना कॉल करून घराचे कुलूप तुटलेले असल्याचे कळविले. त्या वेळी ते घरी आले असता घरातील वरील ऐवज चोरीला गेल्याचे समजले.
















