चोपडा (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी प्रचंड लाठीमार करत हवेत गोळीबार केला होता. याच घटनेच्या निषेधार्थ आज चोपडयात सकल मराठा समाजातर्फे भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी धरणगाव बायपासवर रस्तारोको शांततेच्या मार्गाने करण्यात आले. कोणत्याही प्रकारची घोषणा न करता शांततेत मूक मोर्चा पार पाडण्यात आला. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. मूक मोर्चा 20 ते 25 मिनिटासाठी रस्तारोको करण्यात आला.
यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना महिलांनी तर शहर पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना शाळकरी मुलांतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना असे सांगण्यात आले की, जालन्यात घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई लवकरात लवकर व्हावी. यावेळी मूकमोर्चामध्ये सहभाग घेणाऱ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी आमदार दिलीप सोनवणे, चोसकाचे माजी चेअरमन ऍड घनश्याम अण्णा पाटील, जि.प.चे माजी सभापती गोरख छनू पाटील आदी मराठा समाजाचे मान्यवर मूक मोर्चामध्ये उपस्थित होते.