जळगाव (प्रतिनिधी) शहरालगतच्या मन्यारखेडा शिवारात सरपणासाठी लाकडं गोळा करण्यासाठी गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. अचानक अंगावर आलेल्या बिबट्याशी तरुणाने झुंज दिली आणि ताकदनिशी त्याला दूरवर फेकले. त्यानंतर भेदरलेला बिबट्याने यामुळे जंगलाच्यादिशेने पळ काढला.
मन्यारखेड्यात राहणारा मदन सुखदेव अहिरे (वय २६) रविवारी सकाळी साडेदहाला मन्यारखेडा शिवारातील जंगलात लहान भाऊ राजेंद्र सोबत गेला होता. अचानक झुडपांमध्ये लपलेल्या बिबट्याने मदनवर झेप घेतली. चाहूल लागल्याने मदन सावध झाला तरी बिबट्याने त्याच्या उजव्या कानामागे पंजा मारला. मदनने पूर्ण ताकदीनिशी तो हल्ला परतवला. परंतु बिबट्यांच्या पंज्याची दोन नखं त्यांच्या कानाच्या मागे व खाली रुतले. मदनने जोरदार आरडाओरड केल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. आवाज ऐकून राजेंद्र धावत आला. तेव्हा भावाला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून त्याला लगेचच जीएमसी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याला अॅडमिट करून घेणे आवश्यक असताना उपचार करणाऱ्या वैद्यकीय स्टाफने त्याला ड्रेसिंग करून घरी पाठवून दिले. दरम्यान, या घटनेमुळे मन्यारखेडा शिवारात भितीचे वातावरण पसरले आहे.