भडगाव (प्रतिनिधी) मध्यरात्री बाळाचा अचानक रडायचा आवाज आल्याने आई झोपेतून उठली. पण बाळाकडे बघताच तिचे होश उडाली. आपल्या चार महिन्यांच्या बाळाच्या अंगावर विषारी कोब्रा साप विळखा मारून बसलेला होता. आईने क्षणाचाही विचार न करता कोब्रा सापाला पकडले आणि बाळाच्या अंगावरून फेकले. बाळाचा जीव वाचला मात्र…आईला नागाने दंश केल्याने मातेची मृत्यूशी झुंज सुरू झाली. अगदी गावकऱ्यांनी तर गावातील महादेवाच्या मंदिराचा गाभारा संपूर्ण पाण्याने भरून चिमुकल्याच्या मातेला वाचवावे म्हणून महादेवाला साकडे घातलेय. तालुक्यातील महिंदळे गावात घटना घडली आहे.
महिंदळे येथील भिकन नरसिंग राजपूत यांची कन्या ज्योती हिचे सासर बांभोरी, ता. एरंडोल येथील आहे. काही दिवसांपूर्वी ती बाळंतपणासाठी माहेरी आलेली आहे. काही महिन्यापूर्वी तिला पुत्ररत्न झाले होते. मात्र गेल्या आठवड्यात भयंकर घटना घडली. संपूर्ण कुटुंब पहाटेच्या सुमारास साखर झोपेत होते. यावेळी घरात ज्योती आणि तिचे चार महिन्याचे बाळ एकाच खाटेवर झोपलेले होते. पहाटे ५ वाजता अचानक बाळ रडायला लागले म्हणून ज्योती झोपेतून खाडकन जागी झाली. उठल्यावर पाहते तर काय, तिला आपल्या बाळाच्या अंगावर विळखा घातलेला कोब्रा जातीचा अतिविषारी नाग दिसला.
ज्योतीने क्षणाचाही विचार न करता नागाला हातात पकडून दूर फेकले. यात तिला नागाने दंश केला आणि काही कळण्याच्या आतच ती अस्वस्थ झाली. कुटुंबियांनी तातडीने ज्योतीला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्रकृती खालावल्याने तेथून पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. ज्योती हिला वेळीच सर्पदंश विरोधी लसीची इंजेक्शन देण्यात आली. परंतू सर्प अतिविषारी असल्यामुळे ज्योती हिची मृत्यूची झुंज सुरू होती. दुसरीकडे ज्योती लवकर बरी व्हावी, यासाठी गावातील महिलांनी तिच्या प्रकृतीसाठी महादेवाला साकडे घातले होते. महिलांनी मंदिराचा गाभारा पाण्याने भरला होता. महादेवानेही आपली कृपा केली. ज्योतीची प्रकृती आता धोक्या बाहेर आहे.