मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या मोठ्या खुलाशानंतर राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी प्रभाकर साईल यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र ‘चोर कधी स्वतःला चोर म्हणवत नाही’ असे म्हणत संजय राऊत यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर टीका केली आहे.
“सुशातसिंह राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केले आहे महाराष्ट्रात फक्त गांजा, अफू, चरस याचेंच पीक निघते. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,” असे संजय राऊत म्हणाले.
“याविषयी बोलताना भाजपाच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे,” असे संजय राऊत म्हणाले.
एनसीबीने आरोप फेटाळून लावले आहेत असे म्हटल्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपाशी संबधित पंच आहेत. त्यातील एकानेच पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती दिली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.