मुंबई (वृत्तसंस्था) बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, अशी माहिती करुणा धनंजय मुंडे यांच्या फेसबुक अकाऊंटवरून देण्यात आली आहे. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतल्यानंतर हे सगळे प्रकरण थांबले, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकामध्ये नेमकी कोणती माहिती असणार याचीच चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं होतं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.