अकोला (वृत्तसंस्था) जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस गावातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून ७ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत. पारस गावातील बरड परिसरात बाबूजी महाराज संस्थान म्हणजेच मंदिर आहे. रविवार असल्याने सायंकाळी आरतीसाठी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होती. सायंकाळी साडे सातच्या सुमारास आरती सुरू झाली. याचवेळी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि पारस परिसरातही मुसळधार पाऊस सुरू झाला. रस्त्यावरील येजा करणारे लोकांनी पावसापासून वाचण्यासाठी टिन शेडचा आसारा घेतला. या टिन शेड खाली ४० ते ५० लोक आणि काही भाविक उपस्थित होते. याचवेळी मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबले गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे.
मृतकांची नावे !
अतुल आसरे (वय ३२ वर्ष, बाभूळगाव जि. अकोला), विश्वनाथ तायडे (वय ३५ वर्ष, सोनखेड), पार्वताबाई महादेव सुशील (वय ६५ वर्ष आलेगाव बाजार), भास्कर आंबीलकर (वय ६० वर्ष अकोला), उमा महेंद्र खारोडे (वय ५० वर्ष, भुसावळ) अशी मृत व्यक्तींची नावं असून काहींचे अद्याप नावे कळू शकले नाहीत. तरीही यातील मृतकांची अद्याप पर्यंत ओळख पटली नसून दोन्ही पुरुष असून त्यांची वय ३५ आणि ४५ अशी आहे.
जखमींची नावे !
कोमल जाधव, रूपाबाई तायडे, ज्ञानेश्वर गावंडे, मुरलीधर अंबाकर, नारायण, भागीरथाबाई गुलाबराव लांडे, कौशल्याबाई इंगळे, सुप्रदाबाई वानखड़े, दिवाकर मधुकर इंगळे, सुनंदा रामदास पुंडे, शामराव आठवले, गणेश तायडे, लक्ष्मण बुटे, रामाभाऊ वासुदेव कसूरकार, रुखमा शालिग्राम तायडे, सुरेखा प्रकाश कांबळे, संकेत लक्ष्मण बुटे यासह अन्य लोक जखमी झाले आहेत.
अशी मिळणार मदत
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांसाठी रु 4 लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. तर 40 ते 60 टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 74000/- मदत देण्यात येणार आहे. तर 60 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तींना 2 लक्ष 50 हजार मदत देण्यात येणार आहे. एक आठवड्यापेक्षा जास्त रुग्णालयात असल्यास 16000/- मदत देय आहे. एक आठवड्यापेक्षा कमी रुग्णालयात असल्यास 5400 मदत देय आहे.