5 हजारांची लाच घेणारे मनपातील लाचखोर लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ !
जळगाव (प्रतिनिधी) टेंडरसाठी भरलेली अमानत रक्कम परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेणाऱ्या स्विकारणाऱ्या महापालिकेतील लिपीक आनंद जनार्दन चांदेकर (वय ३७, रा. देविदास कॉलनी) व कंत्राटी कर्मचारी राजेश रमण पाटील (वय ३५, रा. भूषण कॉलनी) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार दि. १९ रोजी सायंकाळच्या सुमारास महापालिकेत घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांची कर सल्लागार संस्था असुन त्यांच्या एका संस्थेला नविन बसस्थानकात नव्याने बांधलेले आधुनिक वातानुकुलीत सार्वजनीक शौचालय पे अँन्ड युज तत्वावर चालविणेकरिता टेंडर भरण्याचे काम केले. दि. ४ एप्रिल रोजी त्या संस्थेने महापालिकेत टेंडर भरुन त्याकरीता ३५ हजारांची अमानत रक्कम भरलेली होती. परंतू ते टेंडर न मिळाल्याने भरलेली रक्कम परत मिळण्याकरीता दि. ३९ जुलै रोजी अर्ज केला होता. अनामत रक्कमेच्या कामा संदर्भात आरोग्य विभागातील लिपीक आनंद चांदेकर यांची तक्रारदार यांनी भेट घेतली होती. ती रक्कम परत मिळुन देण्याकरिता चांदेकर यांनी तक्रारदाराकडे पाच हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
लाचेची रक्कम ठेवायला लावली टेबलावर
याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पथकाने सापळा रचला. त्यानंतर तक्राराला लाचेची रक्कम ही कंत्राटी कर्मचारी राजेश रमण पाटील याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी राजेश पाटील याने ती रक्कम टेबलावर ठेवण्यास सांगितल्यानंतर पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
कारवाईमुळे महापालिकेत खळबळ
लाच घेतांना दोघांना ताब्यात घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आणले. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ माजून गेली होती.