मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवारांबाबत फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट (Controversial Post) केल्यानंतर सध्या कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामिनाला विरोध केला आहे. केतकीच्या याचिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख सध्या सीबीआयच्या ताब्यात आहे. येत्या 10 जून रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जामीन अर्ज केला आहे. पण, अनिल देशमुखांच्या या जामीन अर्जाला केतकी चितळेनं विरोध केला आहे. अनिल देशमुख यांना जामीन देवू नये. जर देशमुखांना जामिन दिल्यास ते फरार होतील”, फरार झाले की ते पुन्हा मिळून येणार नाहीत, असा दावाच केतकीने केला आहे.
दरम्यान, दुसरीकडे, केतकी चितळेवर राजकीय दबावाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो राजकीय नेता कोण? याची चौकशी सीबीआयने करावी अशी याचिका केतकी चितळेच्या वकीलांमार्फत केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे ही याचिका केली आहे. अदिती नलावडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. केतकीवर शाई आणि अंडी फेकत कळंबोली येथे मारहाण करण्यात आली होती.