मुंबई (वृत्तसंस्था) जगातील सर्वात मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना धमकी दिली आणि त्यामुळे ते लंडनला जाऊन बसले, असा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. दरम्यान दोन दिवसांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.
हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांच्याशी चर्चा केली त्यावेळी जूनपासून दीड कोटी लसी द्यायचं त्यांनी ठरवलं होतं. परंतु, त्यांना केंद्राकडून धमक्या देण्यात आल्या. त्यानंतर ते लंडनला जाऊन बसलेले आहेत. केंद्र सरकारने धमकी दिल्यामुळे त्या लशी राज्याला मिळाल्या नाही. एकीकडे राज्य सरकारला डोस द्यायला सांगायचे आणि दुसरीकडे बाजूला धमक्या देण्याचा प्रकार घडला आहे”
दरम्यान, कोरोना लस उत्पादन करणाऱ्या सिरम संस्थेचे अदर पुनावाला यांनी धमकी दिल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे हे प्रकरण हायकोर्टात गेले होते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा गांभीर्याने घ्या, अशी आठवण मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला करून दिली होती. तसेच पुनावाला यांच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करण्याचे निर्देश दिले प्रशासनाला दिले होते. कोरोनाच्या कठीण काळात कोविशिल्ड ही लस तयार करून देशाच्या हितासाठी भरीव कामगिरी केली आहे, याचा हायकोर्टानं पुनर्उच्चार केला होता.