मुंबई (वृत्तसंस्था) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. नाशिकहून ट्रेनने निघालेले हजारो शिवसैनिक तब्बल ३५ तासांनंतर आज पहाटे अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्या स्थानकात पोहोचताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही शिवसेना नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांसोबत त्यांच्याकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. मंगळवार रात्री काही शिवसेना नेते अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून या दौऱ्याच्य तयारीच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली आहे. अयोध्येत आदित्य यांच्या दौऱ्याची होर्डिंग्स लावण्यात आली आहेत.
असा असणार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण दौरा
- सकाळी 11 वाजता आदित्य ठाकरेंचं लखनऊ विमानतळावर आगमन
-दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन. इस्कॉन मंदिराला भेट
-दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद
-दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार - संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन
-संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार
-संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती
-संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान