मुंबई (वृत्तसंस्था) दाऊद इब्राहिम मनी लॉंड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात आठ तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली. त्यानंतर मलिक यांना अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या अटकेनंतर आता शिवसेना नेते परिवहन मंत्री अनिल परब हे देखील ईडीच्या रडारवर असून पुढचा नंबर त्यांचा आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल. असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्यानंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. आता तिसरा नंबर असेल तो परिवहन मंत्री अनिल परब यांचा… ठाकरे सरकारने कितीही दादागिरी केली, माफियागिरी केली तरी उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे केले आहेत. पण आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. राज्यात ज्या ज्या मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत, त्यांचे घोटाळे आम्ही बाहेर काढणार आणि महाराष्ट्र राज्याला नक्कीच घोटाळेमुक्त करणार, असं किरीट सोमय्या म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने नवाब मलिक यांची आठ तास चौकशी केली. अंडरवर्ल्डकडून जमीन घेतल्याचा आरोप मलिक यांच्यावर आहे. इक्बाल कासकर या व्यक्तीने मलिक यांचं नाव घेतल्यानंतर मलिकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आठ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर ईडीने मलिकांवर अटकेची कारवाई केली आहे. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना जे जे रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी नेण्यात आलं आहे. रस्त्यात जागोजागी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते.
















