पाटणा (वृत्तसंस्था) बिहारच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून बिहारच्या जनतेनं एनडीएच्या बाजूनं कौल दिल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच संपूर्ण निवडणुकीत चर्चेत असलेले आरजेडीचे तरूण नेते तेजस्वी यादव मात्र निवडणुकांच्या निकालांनंतर शांत होते. परंतु, आता त्यांनी बिहार निवडणुकांच्या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी बिहारच्या जनतेचे आभारही मानले आहेत.
बिहार निवडणुकांच्या निकालासंदर्भात बोलताना तेजस्वी यादव म्हणाले की, “जनतेचा आदेश महागठबंधनाच्याच बाजूने होता. परंतु, निवडणूक आयोगाचा निकाल मात्र एनडीएच्या बाजून आला. हे पहिल्यांदाच नाही झालं. २०१५ मध्ये जेव्हा महागठबंधन झालं होतं. तेव्हा मतं आमच्याच बाजूने होती. परंतु, भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मागच्या दाराने प्रवेश केला.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “नीतिश कुमार यांचा जेडीयू तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर त्यांच्यात थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असेल, तर त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीचा लोभ सोडायला हवा.” तसेच तेजस्वी यादव यांनी निवडणुक आयोगाकडे मागणी केली आहे की, “पोस्टल मतांची पुन्हा मतमोजणी करण्यात यावी. पोस्टल मतांची गणना सर्वात शेवटी करण्यात आली होती. जी सामन्यतः सुरुवातीला करण्यात येते.”