सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर अंमलबजावणी संचलनालय जप्ती आणल्यानंतर या कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी या संपुर्ण प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला, असा आरोप त्यांनी केला आहे.
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचा लिलाव झाला तेव्हा घाडगे यांनी खरेदी केला होता. लिलाव प्रक्रियेला माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. ”देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच,” असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे. “आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचं त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितलं असता दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आलं असतं. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारं कोणी नव्हतं. त्यांनी सत्तेचा पुरेपूर गैरफायदा केला आणि २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार अजित पवारांच्या काळात झाला,” असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
“थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली. २०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचं त्यांनी मान्य केलं. २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे,” अशी भावना शालिनीताई यांनी व्यक्त केली आहे.