जळगाव (प्रतिनिधी) विरोधी पक्षनेते अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. मात्र, लग्न व्हायचं असेल तर तिथी ची गरज असते. तो तिथी लवकरच येणार असल्याचं सूचक वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार आपल्यासोबत 15 आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवारांसोबत बरेच आमदार आहे. मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक आहे. सध्या अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल. आकडा ते सांगतील तो असेल तोच असेल, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की फुटलेली मुठ आहे हे उद्या दिसेल अशी टीका मंत्री पाटलांनी केली आहे. दरम्यान, थोड्याच दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला होता.