धरणगाव (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) धरणगाव यांच्या वतीने प.पू. गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २८ नोव्हें, ते ५ डिसें. या कालावधीत श्री दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रमांत स.८ वा. भूपाळी आरती, ८.३० ते १० वाजेपर्यंत सामुदायिक गुरुचरित्र पारायण, १०.३० वा. नैवेद्य आरती तसेच सायं. ६ वा. महानैवेद्य आरतीचा समावेश आहे. यासोबतच गर्भसंस्कार, बालसंस्कार, कृषीशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच मानवी जीवनातील विविध समस्यांवर विशेष मार्गदर्शन दिले जाणार आहे. सप्ताह काळात २४ तास अखंड श्री स्वामी समर्थ मंत्रजप, श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन, वीणावादन व विविध यागांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांना मुक्त सहभागाची संधी उपलब्ध आहे. नियतदिनांनुसार श्री गणेश मनोबोध याग, श्री स्वामी याग, श्री गीताई याग, श्री चंडी याग, रुद्र-मल्हारी याग तसेच दि. ४ डिसें, रोजी १२.३० वा. श्री दत्त जन्मोत्सव व महाआरती, तर दि. ५ डिसें, रोजी सत्यदत्त पूजन व देवता विसर्जन होऊन सप्ताहाची सांगता होईल. या पवित्र सप्ताहात अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, धरणगाव तालुका सेवेकरी परिवाराकडून करण्यात आले आहे.















