मुंबई (वृत्तसंस्था) करोना रुग्णआलेख घसरल्याने दिवाळीच्या तोंडावर दुकाने, उपाहारगृहे, मॉलची वेळमर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. अम्युझमेंट पार्क सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यातील सर्व उपाहारगृहे, हॉटेल्स रात्री १२ वाजेपर्यंत तर सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे सरकारने निर्बंध शिथीलकरणाचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सरकारने राज्यातील सर्व उपहारगृहे तसेच हॉटेल्स रात्री बारा वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील. तसेच इतर दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापरी तसेच सेवा क्षेत्राला पुन्हा एकदा उभारी मिळण्यास मदत होणार आहे. सर्वांनी या नव्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात काल टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसेच अम्युझमेंट पार्कमधील वॉटर पार्कशिवाय अन्य उपक्रमांना परवानगी देण्याचे ठरले. पार्क्स मधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्र्याचं शासकिय निवासस्थान वर्षा येथे झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या वेळी लहान मुलांच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य देखील उपस्थित होते. अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत. तसेच कोविडव्यतिरिक्त डेंग्यू, चिकूनगुन्या यांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ असून त्यांच्या उपचारांकडे देखील पुरेसे लक्ष द्यावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.