मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेद्वारे संचालित नागपूर तालुक्यातील माऊरझरी येथील NIT इंजिनिअरिंग कॉलेजवर आज दुपारी ईडीने धाड टाकली. तब्बल तीन तास ईडीचीही छापेमारी चालली.
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मार्गावर असलेल्या माऊरझरी येथील नागपूर इन्सिटट्युट ऑफ टेकनॉलॉजी (एनआयटी) महाविद्याालयावर छापे टाकले. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशमुख यांच्या कुटुंबीयांनी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी साई शिक्षण संस्थेच्या वापर केला असा त्यांच्यावर आरोप आहे. दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने डोनेशन म्हणून या शिक्षण संस्थेत पैसे टाकले होते. त्यासाठी बोगस शेल कंपन्यांचा वापर करण्यात आला. त्याचाच तपास करण्यासाठी ईडीचे एक पथक शुक्रवारी माऊरझरी येथील NIT कॉलेज मध्ये पोहचले. या पथकात तीन अधिकाऱ्याचा समावेश होता. ईडीने आपल्या सोबत सीआरपीएफचे पथक सोबत आणले होते.
राज्य सरकारला नोटीसही बजावण्यात आली
दरम्यान, दुसरीकडे सीबीआयकडून देखील अनिल देशमुख प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यासंदर्भात राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. सीबीआयनं न्यायालयात मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईच्या एका एसीपींनी सीबीआयच्या तपास अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा सीबीआयनं केल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे. “महाराष्ट्र सरकार तपासामध्ये सहकार्य करत नाहीये. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर देखील अनिल देशमुख प्रकरणातील तपास पथकाला सहकार्य केलं जात नाही. सहकार्य करण्याऐवजी मुंबईचे एक एसीपी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्याला धमकी देत आहेत”, असा दावा सीबीआयकडून करण्यात आला आहे.