मुंबई (वृत्तसंस्था) कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.
शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गायब झाल्यानंतरही उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्याबाबतही कुजबूज सुरू झाली होती. अखेर आज ते गुवाहाटीकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत. राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत (Uday Samant) शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी (ता. २४) पाली येथील निवासस्थानी मंत्री उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केली. कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असा अंदाज मांडला जात होता. आमदारांना मिळणाऱ्या निधीपासून हिंदुत्वाच्या विचारधारेपर्यंत विविध कारणे देत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं आहे. हे सर्व बंडखोर आमदार आधी सूरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत युती करावी, अशी या आमदारांची मागणी आहे.















