मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला. आज १६ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या महासोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेदहाच्या सुमारास या सोहळ्यला सुरुवात होणार आहे. या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातील लाखो श्री सदस्य खारघरमध्ये दाखल झाले आहेत. खारघर येथे होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काही केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळ सदस्यांसह राज्यभरातील आमदार, खासदार, काही उद्योजक तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबीय उपस्थित राहणार आहेत.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्यादरम्यान आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण कार्यक्रम, रोजगार मेळावे, स्वच्छता मोहिम, व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापन, आरोग्य शिबिर, समाज प्रबोधन व बाल संस्कार वर्ग यांसारखे अनेक मोलाचे कार्य केले आहेत.













