वाकोद, ता. जामनेर (प्रतिनिधी) जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या सफरीवर आलेल्या पर्यटकांना रविवारी (दि. १०) अजिंठा लेणीतील एसटी बससेवेच्या मनमानी कारभाराचा फटका सहन करावा लागला. सुमारे तीन-तीन तास लांबच लांब रांगेत उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागल्याने पर्यटकांनी सोयगाव आगाराने अजिंठा लेणीत चालविलेल्या गलथान कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत खासगी वाहनांना प्रवेश बंदी असल्याने फर्दापूर टी. पॉइंट ते अजिंठा लेणी या पाच किलोमीटरच्या अंतरात एसटी महामंडळाच्या सोयगाव आगारमार्फत बससेवा पुरवली जाते. मात्र, अजिंठा लेणी सफरीवर आलेल्या पर्यटकांना अनेकदा अजिंठा लेणीत अपुऱ्या बसच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या सोयगाव आगाराच्या मनमानी अपुऱ्या बससेवेचा फटका सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. रक्षाबंधन व त्यातच शनिवार-रविवारची सुटी लागून आल्याने रविवारी (दि. १०) सकाळपासूनच मोठ्या संख्येने पर्यटक अजिंठा लेणी सफरीवर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र अजिंठा लेणीत खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने या पर्यटकांना त्यांची महागडी वाहने फर्दापूर टी पॉइंट येथील पर्यटन महामंडळाच्या वाहन तळावर उभी करावी लागून पुढील प्रवासासाठी फर्दापूर-अजिंठा लेणी टी. पॉइंट येथील एसटी बसस्थानकावर यावे लागले. त्यामुळे अजिंठा लेणीत येणाऱ्या पर्यटकांची फर्दापूर-अजिंठा लेणी टी. पॉइंट येथील बसस्थानकावर प्रचंड गर्दी झाली. मात्र, अशा स्थितीतही या ठिकाणी एसटी महामंडळाच्या सोयगाव आगाराने अजिंठा लेणीत जाण्यासाठी फर्दापूर-अजिंठा लेणी टी पॉइंट येथील एसटी बसस्थानकावर केवळ ६ बस, ६ चालक वाहक, १ वाहतूक निरीक्षक, १ वाहतूक नियंत्रक व १ सहाय्यक वाहतूक नियंत्रक एवढीच वाहतूक सेवा व मनुष्यबळ तैनात केल्याने अजिंठा लेणी सफरीवर आलेल्या अनेक पर्यटकांनी एसटीच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करीत अजिंठा लेणी न बघताच माघारी फिरणे पसंत केले.
तक्रारीनंतर नवी चार बस मागविल्या
स्थानिक पत्रकार व नागरिकांनी सोयगाव आगारात संपर्क साधून येथील स्थितीची माहिती दिल्यानंतर सोयगाव आगारातून पुन्हा चार बस अजिंठा लेणीत सोडण्यात आल्याने सागण्यात आले. रविवारी अजिंठा लेणी सफरीवर आलेल्या पर्यटकांना मात्र दुपारी दोन वाजेपर्यंत एसटीच्या मनमानी कारभारामुळे प्रचंड त्रास सहन करावा. एसटीच्या या तोकड्या व अपूर्ण बससेवेची पोलखोल होण्यास सुरुवात होऊन फर्दापूर-अजिंठा लेणी टी पॉइंट बसस्थानकावर बसचे तिकीट मिळविण्यासाठी जवळपास पाचशे मीटरपर्यंत पर्यटकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तीन-तीन तास उन्हातान्हात उभे राहूनही बस तिकीट मिळत नसल्याने पर्यटक चांगलेच भडकले व या संतप्त पर्यटकांनी फर्दापूर- अजिंठा लेणी टी पॉइंट बसस्थानकावर उपस्थिती असलेल्या एसटीच्या वाहक – चालकांना खडेबोल सुनावले.