मुंबई (वृत्तसंस्था) सोमय्यांवर हल्ला झाल्यास हल्लेखोरांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता भाजप दिल्लीचे पोलीस मुंबईत मराठी माणसांना गोळ्या झाडणार आहेत का, असा सवाल त्यांनी केलाय.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना केंद्र सरकारने ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. त्यांच्या सुरक्षितेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. केंद्राची सुरक्षा असतानाही सोमय्या यांना दोन वेळेस कथितपणे मारहाण झाली. शनिवारी खार पोलीस ठाण्याजवळ झालेल्या घटनेत सोमय्यांच्या कारची काच फुटली आणि त्यांना लहान जखम झाली होती. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह सोमय्यांच्या सुरक्षितेचा मुद्या उपस्थित केला. त्यानंतर सीआरपीएफने सोमय्यांच्या सुरक्षितेबाबत कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता सोमय्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यास गोळ्या झाडण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले की, केंद्राकडून घेण्यात येणारा हा निर्णय म्हणजे दिल्लीतल्या पोलिसांच्या हातातून मराठी माणसांना गोळ्या झाडण्याचा प्रकार आहे. या आधी मोरारजी देसाई यांनीदेखील असाच प्रयत्न केला होता. आता केंद्र सरकारही तेच करत आहे. भाजपचे नेते राज्यात काहीही करणार आणि त्याला जनतेने विरोध केल्यास तुम्ही गोळ्या झाडणार का, असा सवाल त्यांनी केला. केंद्राचा हा निर्णय म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रयत्न असल्याचे राऊत यांनी सांगितले. मुंबईला केंद्रशासित करण्यामागे सोमय्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.
















