बुलढाणा (वृत्तसंस्था) : शहरात कमी प्रमाणात तर गाव-खेड्यात अनेकदा अंधश्रद्धेतून अघोरी प्रकार केले जात असल्याचा घटना अनेकदा घडतात. खामगाव तालुक्यातील पारखेड गावातील नागरिकांसाठी १४ ऑगस्टचा दिवस प्रचंड भीतीदायक ठरला. कारण गावच्या स्मशानभूमीत मध्यरात्री अज्ञात लोकांनी अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सकाळी गावातील काही महिलांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पारखेडच्या स्मशानभूमीत काही अज्ञात व्यक्तींनी ही अघोरी पूजा केली. स्मशानभूमीत वेगवेगळ्या ठिकाणी लिंबू ठेवले असून त्या लिंबांना टाचण्यादेखील टोचल्या होत्या. याशिवाय लिंबाच्या भोवती रांगोळीचे, तांदळाचे गोल रिंगण करण्यात आले होते. संपूर्ण स्मशानभूमीत ठेवलेल्या लिंबाभोवती हळद-कुंकूही टाकण्यात आले होते. हा काळ्या जादूचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर काहींच्या मते ही गुप्तधनासाठी बळी देण्याची प्रक्रिया असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ही अघोरी पूजा केली कुणी? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.
दरम्यान, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे किशोर वाघ यांनी सुद्धा या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण असे कृत्य करणे म्हणजे शासनाच्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा असल्याचे वाघ यांनी सांगितले. तसंच गावातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहनही वाघ यांनी केलं आहे.