जळगाव (सुरेश उज्जैनवाल) थकीत कर्जापोटी जळगाव जिल्हा सहकारी बँकेने फैजपुरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून आता ती विक्री करण्याचा विचार सुरू केला आहे. कारखाना भाडे तत्वावर देण्याचा पर्याय असताना, विक्री चा विचार हा घातक तर आहेच शिवाय तो सहकाराची हत्या करणारा ठरेल.
जिल्यातील सर्वच सहकारी साखर कारखान्यांची गेल्या दहा वर्षातील वाटचाल लक्षात घेता केवळ फैजपुरचा मधुकर तग धरून होता नव्हे आपले आर्थिक अस्तित्व टिकवून होता .आपल्या 42 वर्षाच्या अखंड वाटचालीत अनेक आव्हाने पेलत दिमाखात कार्यान्वित राहिला, खान्देशातील इतर कारखान्याशी मधूकरची तुलना होऊच शकत नाही. सन 2009 मध्ये कारखान्यात राजकीय स्थित्यतर घडले नसते, तर कदाचित कारखाना डबघाईत गेला नसता, परन्तु पक्षीय राजकारणाने या कारखान्याला आर्थिक गर्तेत आणून सोडले. त्याचा परिणाम म्हणून कारखान्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. थकीत कर्जा पोटी जिल्हा बँकेने 25 एप्रिल 2022 रोजी कारखान्याची मालमत्ता जप्त करून कारखान्याला सील ठोकले. ही कारवाई करतांना बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी कारखाना भाडे तत्वावर खासगी क्षेत्राला देऊ असा शब्द दिल्याचे कारखान्याचे माजी चेयरमन शरद महाजन, भागवत पाटील, नरेंद्र नारखेडे या मंडळी ना दिला होता, मात्र गेल्या आठवड्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखाना विक्री करण्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
◆ मधुकर : व्यवहार कुशल संस्था…..◆
मधुकर सहकारी साखर कारखाना या संस्थेने जिल्हा बँकेचे कर्ज गेल्या 42 वर्षात कधी ही थकविले नाही, हा पण एक इतिहास आहे 2016-17 पर्यंत नियमित कर्जाची वेळेत परतफेड केली. मात्र 2017 नंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने कर्ज नियमित भरण्यात खंड पडला परिणामी आज मितीला सुमारे 58 कोटीचे कर्ज थकले. एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज थकल्याने बँक देखील अडचणीत आली आहे. त्यामुळे बँकेला नाईलाजास्तव मालमत्ता सील करावी लागली . अस असलं तरी बँकेने या संदर्भात शेतकरी आणि सहकार क्षेत्राचा विचार करता, कारखाना विक्री चा विचार करणे संयुक्तिक नाही. मुळात कारखान्याची मालमत्ता 100 कोटाच्या जवळपास आहे आणि आपल्या 42 वर्षाच्या अखंड वाटचालीत बँकेला 70 कोटी पेक्षा जास्त व्याजा च्या माध्यमातून दिले आहे. मुळात सहकार क्षेत्रातील संस्था अथवा कारखानदारी मोडित निघत असताना आणखी एक आघाडीचा कारखाना विक्रीच्या माध्यमातून खासगी भांडवलदारांच्या घश्यात देणे सहकारी तत्वाशी विसंगत ठरेल. त्या पेक्षा भाडे तत्वावर चालविण्यास देण्याचा जाणीवपूर्वक पूर्वक प्रयत्न करणे हे व्यवहारिक शहानपणाचे ठरेल.
….
ता.क . मधुकर साखर कारखाण्याची स्थिती अशी का झाली कोणते घटक याला जबाबदार आहेत…या विषयी सविस्तरपणे क्रमश:
सुरेश उज्जैनवाल,
ज्येष्ठ पत्रकार जळगाव
८८८८८८९०१४