पारोळा (अँड. वसंतराव मोरे) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक, मराठी जनतेच्या हृदयात सहा दशकाहून जास्त काळ विराजमान आमचे मार्गदर्शक श्री. शरद पवार साहेब यांचा आज ८१ वा वाढदिवस त्यांना जन्म दिनाच्या आदरपूर्वक सहृदय शुभेच्छा अन अभिष्टचिंतन..!
मी काही लेखक नाही किंवा लेखन हा माझा विषय देखील नाही. पण साहेबांच्या प्रती असलेला आदरभाव व त्यांचा दिर्घकाळ चा पाईक म्हणून ज्या काही असामान्य आणि विलक्षण गोष्टींचा अनुभव मला आला त्यातूनच हा लेखन प्रपंच. त्यांच्यातील नेतृत्वगुणांबद्दल जी सर्व समावेशकता अनुभवास येते, ती महाराष्ट्र व तमाम मराठी जनतेसाठी अभिमानास्पद वाटावी अशीच आहे. सामाजिक लोकभावने संदर्भातील त्यांची समज व तळमळ त्यांच्यातील दूरदृष्टीचा परिपाक म्हणता येईल. त्यांनी राज्य व देशासाठी केलेल्या कामांची येथे मांडणी करणे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्या बाहेर आहे, पण त्यांनी महाराष्ट्रावर ज्या ज्यावेळी संकटे आली, ती त्यांनी किती तत्परतेने परतून लावली किंबहुना त्यांच्यावर कसा विजय मिळविला हे मी या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
मुंबई : १३ सिरीलय बॉम्ब ब्लास्ट ..!
१२ मार्च १९९३ हा दिवस इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला गेला. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ख्याती असलेली मुंबई साखळी बॉम्ब स्फोटाने प्रचंड हादरली. अतिरेकी गुंडांच्या टोळीने मुंबई मध्ये विविध १३ ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. अत्यंत क्रूरपणे घडवलेले बॉम्ब स्फोट अतिरेक्यांच्या संतानी वृत्तीचा कळस म्हणता येईल. या विनाशकारी घटनेने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्रचंड हानीमुळे मुंबई पूर्वपदावर येण्यास महिनाभर तरी लागेल असे त्यावेळी वाटत होते. मात्र मुख्यमंत्री पवार साहेब क्षणाचाही विलंब न करता तातडीने मदत पुरविण्याचे कार्य करीत होते. असामान्य धाडस आणि शासकिय यंत्रणेवरील आत्मविश्वासाच्या जोरावर तसेच सर्व समाज घटक, राजकिय पक्षांना सोबत घेऊन त्यांनी या दुर्घटनेवर अवघ्या चोवीस तासांच्या अविश्रांत उपाययोजना व परिश्रमाच्या माध्यमातून विजय मिळविला. साहेबांच्या दूर्दम्य इच्छाशक्तीचा हा परिपाक म्हणता येईल. जगात असे उदाहरण नसावे, मुंबईचे जनजीवन सुरळीत करुन त्यांनी देशात सर्वोत्तम नेतृत्वाचे आदर्श उदाहरण प्रस्थापित केले. आणिबाणीच्या परिस्थितीत सर्वोत्तम नेतृत्व म्हणून देशभर साहेबांची वाह वाह होत होती…..
..३० सप्टेंबर १९९३ किल्लारी भूकंप ..!
वर्ष १९९३ महाराष्ट्रासाठी गंभीर परिक्षा घेणारे वर्ष ठरले. मुंबईतील दंगली, साखळी बॉम्ब स्फोट त्या पाठोपाठ मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांमधील भूकंपाने मोठे संकट आणि आव्हान उभे केले. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३.५४ वाजता भूकंप झाला. लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील ५२ गावांतील सुमारे ३० हजार घरे कोसळली. या दुर्घटनेत साडे सात हजारांपेक्षा जास्त जणांचा दुर्देवी मृत्यू तर १५ हजारांहून जास्त लोक जखमी झाले. या विनाशकारी घटनेची माहिती मुख्यमंत्री पवार साहेबांना मिळताच क्षणाचाही विलंब न लावता लोकसेवक पवार साहेब किल्लारीला पोहचले. साहेब घटनास्थळी तळ ठोकून बसले होते. जणू काही मुंबईतील कार्यालयच त्यांनी घटनास्थळी हलविले होते. सन्माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनर्वसनाची एक जलद परिणामकारक व्यापक योजना तयार करण्यात आली. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या भूकंपावर अवघ्या २४ दिवसात मात करीत घरबांधणीचे २४ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काम सुरु झाले आणि ठरविलेल्या कालावधीत भूकंप ग्रस्तांचे पुनर्वसन झाले. सामाजिक बांधिलकीतून कर्तव्य तत्परतेचे हे असामान्य उदाहरण महाराष्ट्राने नव्हे तर अख्या जगाने अनुभवले.
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न…!
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील दुर्देवी भूकंपादरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नाने नवीन वादाला तोंड फुटले. राज्यात पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार असताना माननीय साहेब मुख्यमंत्री असताना त्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न ही केला होता. परंतू काही तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. दलित समाजाची मागणी रास्त असल्याची भावना साहेबांची होती. महाराष्ट्रासाठी सामाजिक दृष्ट्या विद्यापीठाचा विषय महत्वाचा मानुन साहेबांनी यावर सर्वमान्य पर्याय शोधला. नामांतरा ऐवजी नामविस्तार करण्याचा निर्णय घेत दलित बहुजनांचे समाधान करण्यात ते यशस्वी झाले. या प्रश्नाची सोडवणूक चतुराई सह मोठ्या कुशलतेने केली. मराठवाडा नामांतराचा ठराव सन १९७८ मध्ये राज्य विधिमंडळात पारित झाला होता आणि त्याची अंमलबजावणी १९९४ साली झाली. सुमारे ४० वर्ष चाललेला हा तिढा साहेबांनी मोठ्या कौशल्याने मार्गी लावत महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा अबाधित ठेवला.
..शेतकऱ्यांसाठी लाँग मार्च.. आंदोलन ..!
शेतीमालाला योग्य भाव मिळावा या सह विविध आठ मागण्यांसाठी तत्कालीन अंतुले सरकारच्या विरोधात साहेबांनी शेतकरी दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून त्यांच्यातील प्रखर आंदोलक म्हणून महाराष्ट्राने अनुभवले. या शेतकरी दिंडीची सुरुवात जळगांव मधून झाली. ७ डिसेंबर १९८० रोजी जळगाव ते नागपूर अशी ४५० किलोमिटर पायी दिंडी जणू शेतकरी लाँग मार्च ठरली. खान्देश ते विदर्भ दरम्यानच्या हजारो शेतकऱ्यांनी हिरीरीने भाग घेत दिंडी यशस्वी करुन दाखविली. या दिंडीमुळे साहेबांची जननेता म्हणून प्रतिमा देशभर निर्माण झाली.
समारोप..
उत्तम व जागरुक संसदपटू राजकारणाचे सर्वोत्कृष्ट ज्ञाते, अद्भुत स्मरणशक्तीचे शहॅशाह, लोक महानायक माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाचे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिष्टचिंतन…!
अॅड वसंतराव मोरे उर्फ मोरे काका
माजी खासदार पारोळा- जळगाव
९४२२२७६९९९