मुंबई (वृत्तसंस्था) मंदिर उघडल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारचा दिवस उत्साहात साजरा केला. काही महाविकास आघाडी सरकारचे नेते रिकामटेकडे टीका करु लागले की भाजपने श्रेय घेऊ नये. मुळात महाविकास आघाडी सरकारचा आणि हिंदू धर्माचा काही संबंध शिल्लक राहिलेला नाही, अशी घणाघाती टीका निलेश राणे यांनी केली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून बंद होती. भाजप, वंचित तसेच मनसेने मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी आंदोलने केली. अखेर पाडव्याच्या मुहूर्तावर अटी नियमांसहित राज्यभरातील मंदिरे-देवस्थाने सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केला. पाडव्याच्या दिवशी भल्या सकाळीच मंदिरे सुरु होणार असल्याने भक्तांनी मंदिराबाहेर, देवस्थानाबाहेर गर्दी केली होती. तब्बल ८ ते ९ महिन्यांनी त्यांना देवाचं दर्शन घेता येणार होतं. अनेक ठिकाणी ऑनलाईन दर्शन पास तर कुठे मुखदर्शन पाहायला मिळालं. आमच्या मागणीमुळे आणि आंदोलनामुळेच सरकारला मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं म्हणत भाजपच्या बड्या नेत्यांनी मंदिरांबाहेर आनंदोत्सव साजरा केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, भाजप आमदार रविंद्र चव्हाण तसंच भाजपचे विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सरकारच्या मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचं स्वागत करताना भाजपच्या आंदोलनामुळे ठाकरे सरकारला हा निर्णय घ्यावा लागल्याचं म्हटलं जात आहे.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरे सरकारने राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपने राज्यातील विविध देवस्थाने तसंच मंदिरांच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला. भाजपने आनंदोत्सव साजरा केल्याने सरकारमधील काही मंत्री, नेत्यांनी भाजपवर टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.