धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे या गावी अंगणातील झाड म्हशीने खाल्ले या कारणावरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात एका वयोवृद्धाला काठीने मारहाण केल्यामुळे दुखापत झाली असून याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात संदिप संभाजी पाटील (वय ३२ रा. साकरे ता. धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ८ जून २०२२ रोजी शेखर युवराज पाटील, सरला शेखर पाटील, शरद युवराज पाटील, दिपाली शेखर पाटील, अश्विनी शेखर पाटील यांनी गैर कायदेशीर मंडळी जमवून शेखर पाटील यांच्या अंगणातील झाड संदीप पाटील यांच्या म्हशीने खाल्ल्याच्या कारणावरून संदीप पाटील व त्यांचे वडील संभाजी चैत्राम पाटील, काका विश्वास चैत्राम पाटील, काकु मंगलाबाई विश्वास पाटील, अशांना वहिनी नम्रता प्रदिप पाटील, तसेच शेजारी नाना फुला पाटील यांनी शिवीगाळ दमदाटी करुन हाता बुक्कयांनी मारहाण केली. तसेच सरलाबाई शेखर पाटील हिने तिच्या हातातील लाकडी काठीने संदीप पाटील यांच्या वडीलांना मारुन दुखापत केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील हे करीत आहेत.