मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ऑक्सिजन, रेमडेसिवीर, कोरोना लस यासारख्या वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र ट्विट करताना पंकजांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत. असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर आणि लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. याकडे पंकजा मुंडे यांनी पत्र लिहून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं लक्ष वेधलं आहे. पंकजा यांनी हे पत्र ट्विटही केलं आहे. ट्विट करताना त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर नामोल्लेख टाळून टीका केली आहे. “रेमडेसिवीरचा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विनंती आहे, जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाखांपैकी बीडलाही पुरेशी लस मिळाली पाहिजेत. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे, जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत,” असं म्हणत पंकजांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
पंकजा मुडेंचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र
“बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ असली तरी त्यातील ३० हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत.
एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीने रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे.
त्यामुळे आपणास विनंती आहे की, आपण यात जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत. ही अतिशय खेदजनक बाब आहे. तथापि याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेसे वॅक्सीन उपलब्ध करुन द्यावेत आणि तशी व्यवस्था आपण करावी आणि संबंधित यंत्रणेला सूचित करावे.” अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.