जळगाव (प्रतिनिधी) काळाने आज गिरीष महाजन यांना अडीच वर्षातच जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून धडा शिकवला आहे. त्यांनी सत्तेच्या मस्तीत केलेल्या कर्माचे फळ म्हणून आज त्यांना महानगरपालिकेतून बाहेर पडले आहेत. ही त्यांनी केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगण्याची सुरुवात झालेली आहे व यापुढे देखील त्यांना वेळोवेळी केलेल्या कर्माची फळे ही भोगावी लागणारच आहेत, अशी टीका जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अॅड. विजय पाटील यांनी केली आहे.
अॅड. विजय पाटील यांनी काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, जळगाव शहर महानगरपालिकेत सन २०१८ मध्ये माजी मंत्री गिरीष महाजन यांनी सुमारे २० ते २५ कोटी रुपये खर्च करुन भारतीय जनता पार्टीचे ५७ नगरसेवक निवडून आणले होते. त्यातील मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातून आयात केलेले नगरसेवक यांचा देखील त्यावेळी घोडेबाजार करुन व आर्थिक रसद देऊन ऐनवेळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देण्यात आली होती.
पाच वर्षासाठी जळगावच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला शहराची धुरा सांभाळण्यास दिलेली असतांना फक्त अडीच वर्षामध्येच भाजपाची महानगरपालिकेतील पुर्ण बहुमताची सत्ता गेल्याने गिरीष महाजन यांना आज कसे वाटत असेल? असा विचार आमच्या मनात आला. ज्याप्रमाणे गिरीष महाजन मंत्री असतांना त्यांना सत्तेचा माज असल्याने जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत सन २०१५ ते २०२० या कालावधीसाठी आमचे संचालक मंडळ कायदेशीर निवडून आलेले असतांना सत्तेच्या मस्तीपोटी महाजन यांनी आमच्या संस्थेत त्यांना कै.नरेंद्रअण्णा पाटील यांचे विचाराचे संचालक मंडळ असल्याने तेथे त्यांना आर्थिक घोडेबाजार करता येत नसल्याने त्यांनी आम्हाला अडीच वर्षातच संस्थेतून पोलीसांच्या मदतीने बाहेर काढले. परंतु काळाने आज गिरीष महाजन यांना देखील अडीच वर्षातच जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून धडा शिकवून त्यांनी सत्तेच्या मस्तीत केलेल्या कर्माचे फळ म्हणून आज त्यांना महानगरपालिकेतून बाहेर काढले आहे, ही त्यांनी केलेल्या वाईट कर्माचे फळ भोगण्याची सुरुवात झालेली आहे व यापुढे देखील त्यांना वेळोवेळी केलेल्या कर्माची फळे ही भोगावी लागणारच आहेत. तरी शेवटी ” काळ हा नेहमीच श्रेष्ठ असतो ” हे आज सिध्द झालेले आहे, असेही अॅड. विजय पाटील यांनी म्हटले आहे.