बेळगाव (वृत्तसंस्था) बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. समोर आलेल्या निकालानुसार बेळगाव महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे २६ उमेदवार जिंकले असून, ९ ते १० उमेदवार आघाडीवर आहे.
भाजपने या निवडणुकीत अतिशय ताकदीने आणि आक्रमकरित्या प्रचार केला होता. भाजपच्या कष्टाचं फळ त्यांना मिळालं आहे. दुसरीकडे बेळगाव महापालिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकविण्याचं राऊतांनी बोलून दाखवलेलं स्वप्न मात्र भंगलं आहे. या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरल्यामुळे निकालाची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. आमचे ३० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपने बेळगाव महापालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. ५८ प्रभागात ३८५ उमेदवार आपलं नशीब आजमवत होते. त्यापैकी जवळपास निम्म्या जागांवरचा निकाल जाहीर झाला आहे. तर पुढच्या काही तासांत उर्वरित जागांचा निकाल हाती येईल.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी
मतमोजणीला सुरुवात होताच महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं पहिलं खातं उघडलं. त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार उमेदवार विजयी झालेत. पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शिवाजी मंडोळकर विजयी झालेत. वॉर्ड क्रमांक १४ मधून त्यांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक २७ मधून रवी साळुंखे विजय आणि वार्ड क्रमांक १९ मधून अंकुश केसरकर विजयी झालेत. आतापर्यंत ५८ पैकी चार जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपल्या विजयाचा झेंडा रोवला आहे.
एकूण ५८ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. त्याची आज मतमोजणी होईल. एकूण ३८५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत २१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप ५५, काँग्रेस ४५ जेडीएस ११, आम आदमी ३७, एआयएमआयएम ७, अन्य दोन आणि अपक्ष २१७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल.